ओंकारगणेशा - चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या ओंकार स्वरूप श्रीगणेशाचे विविध अविष्कार...
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभः। निर्विघ्नं कुरू मे देव सर्व कार्येषु सर्वदा।
अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणा-या विघ्नहर्त्या श्री गणेशाचे विविध आविष्कार एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत या हेतूने हा ब्लॉग नोव्हेंबर २०१० पासुन सुरु करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवरील मजकूर हा विविध ग्रंथ तसेच काही धार्मिक साहित्य संग्रहातून संकलित करण्यात येत आहे. जसे गणेश पुराण, गणेश कोश, मुग्दल पुराण व इतर धार्मिक साहित्य इ.

गणेशोत्सव... एक आनंदसोहळा...




श्रावण मास आला की भाद्रपद महिन्यातील गणेश उत्सवाचे वेध सर्वच आबाल-वृद्धांना लागतात. भाद्रपदामधील शुक्ल चतुर्थीस आपल्या घरी गणरायाचे आगमन होते. गणरायाच्या आगमनाच्या तयारीची लगबग कित्येक दिवस आधीपासून दिसू लागते. विविध आकार व प्रकारातील सुबक व आकर्षक अशा कलात्मक गणेशमूर्ती व आरास करण्यासाठी लागणा-या साहित्यांनी बाजारपेठ गजबजून जाते. 

गणेशोत्सवाची पूर्वतयारी

घराण्यातील प्रथेप्रमाणे दिड, अडीच, पाच, सात किंवा दहा दिवसांचा गणपती बसविला जातो. आमच्याकडे मात्र आमच्या इच्छेप्रमाणे  दहा दिवसांचा गणपती बसविण्यास आम्ही सुरुवात केली. आपल्या मनातील गणेशाची कल्पना मूर्त स्वरुपात शोधण्यासाठी साधारणत: २-३ आठवडे आधीपासून गणेशमूर्तीचे स्टॉल्स धुंडाळले जातात आणि आपल्या मनाला भावेल अशी गणेशमूर्ती कुठल्याही प्रकारचे बार्गेनिंग न करता बुक केली जाते. मूर्ती घरी आणेपर्यंत कुणाचीही दृष्ट लागू नये म्हणून बुक केल्याकेल्याच मूर्तीच्या हातात काळा दोरा बांधण्यात येतो. त्यानंतर मग गणेशउत्सवाच्या म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थीपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंतच्या दहा दिवसात आपण आपल्या लाडक्या गणरायाचे स्वागत कसे करायचे? नेहमीपेक्षा वेगळी पण कलात्मक आरास कशी करायची? याबाबत घराघरात चर्चा सुरु होतात. ऑफिसला कोणत्या दिवशी सुट्ट्या घायच्या म्हणजे जोडून आलेल्या सुट्ट्यांचा लाभ घेवून जास्तीत जास्त दिवस घरात राहता येईल? गणराय आपल्या घरी आपल्या सोबत तब्बल दहा दिवस राहणार तेव्हा त्याची बडदास्त कशी ठेवता येईल याचेच विचार प्रत्येकाच्या मनात सुरु होतात व घरातील सर्व सदस्य एका वेगळ्याच उल्हासाने कामास लागतात. 

कामांना सुरवात होते ती घरातील साफ-सफाई व स्वच्छतेपासून. स्वच्छता झाल्यानंतर संपूर्ण घर व घरातील वस्तूं स्वच्छ व निटनेटक्या दिसू लागतात. मग हळद, कुंकू, गुलाल, बुक्का, अष्टगंध, कापूर, अत्तर, वेगवेगळा सुवास असणाया अगरबत्त्या, धूपबत्त्या, ओला व सुका धूप, तेलवाती, तूपवाती, रांगोळी, रांगोळीसाठी लागणारे रंग, गणपतीच्या गळयात घालण्यासाठी जानवे, यासारख्या पूजा साहित्याची जमवाजमव आधीच केली जाते. गणपतीमध्ये लागणारे काही खास साहित्य विशेषत: मोठ्या समया, वेगवेगळे दिवे, पूजा साहित्याचे कप्पेखानी सुबक ताट, आरतीपात्र, धूपभांडे, घंटा, ताम्हन, गडवे, चौरंग-पाट पोटमाळयावरुन खाली काढून स्वच्छ व लखलखीत करुन ठेवण्यात येतात. आरास करण्यासाठी लागणारे साहित्य (ज्यात प्रत्येक वर्षी नव्याने भर पडते) म्हणजे मखर, रंगबिरंगी तलम पडदे, सर्व दारांना लावण्यासाठी पडदे, मधल्या दारासाठी काचेच्या व विविध प्रकारातील लटकंती माळा, चटया, बस्तर, रोशनाईच्या लाईटच्या माळा, फोकस आदी तयार ठेवण्यात येते. गणेशाची प्राणप्रतिष्ठा व सत्यनारायण पूजा यांसाठी ऐनवेळी भटजी मिळणे महामुश्कील काम, त्यासाठी काही दिवस आधीच भटजीबुवांना बुक करावे लागते. त्यानंतर मग गणपतीची गाणी आणि आरती यांच्या सीडीज तयार ठेवणे. त्यातही पहिल्या दिवशी प्राणप्रतिष्ठेनंतर व शेवटच्या दिवशी आमच्याकडे ५५ मिनिटे आरती चालते त्यात गणपती, शंकर, देवी, साईबाबा, विठोबाची अशा आरत्या व मंत्रपुष्पांजली असते, याची स्वतंत्र सीडी तयार करावी लागते. फोटो काढण्यासाठी कॅमेरा चार्ज करणे, त्याचे मेमरी कार्ड फ्री करणे ही कामेदेखील असतात.

भाद्रपदामधील शुक्ल चतुर्थीच्या आदल्या दिवशी रात्री उशिरापर्यंत आरास व सजावट केली जाते.  बैठकीच्या खोलीत जिथे गणपती बसविणार तेथे पुर्वेला तोंड करुन गणपतीची बैठक व इतर आरास  केली जाते. कितीही रात्र झाली तरी प्रत्येक घरी हा कार्यक्रम न थकता चालूच असतो. 


प्रतिष्ठापना व उत्सवाचा श्रीगणेशा

भाद्रपदामधील शुक्ल चतुर्थीच्या पहिल्या दिवशी भल्या पाहटे उठून गणरायाच्या आगमनाची तयारी करण्यात येते. घरातील साफ-सफाई, दाराला फुलांचे तोरण, दारासमोर रांगोळी, फुलांची पायवाट, दिवे, घरात धूप व सुवासिक अगरबत्यांचा दरवळ, देव्हाऱ्यातील देवांची पूजा, एकीकडे गणपतीची सुमधुर गाण्याची सीडी वाजत असते. तर दुसरीकडे शक्य तितक्या लवकर गणपतीस आपल्या घरी आणण्याची घाई चालू असते. घरातील सर्व लहान- मोठे आपापल्या परीने घरातील सर्व कामे आटोपण्याच्या गडबडीत असतात. 

जोपर्यंत गणराय घरी आणत नाही व त्यांची प्रतिष्ठापना होत नाही तोपर्यंत उपवास केला जातो. आम्ही सकाळीच नवीन वस्त्र परिधान करून गणपती आणण्यासाठी गणपतीच्या स्टॉलवर जातो. तिथे गेल्यावर आपल्या गणेशमूर्तीचे मुख नविन पांढ-या वस्त्राने / रुमालाने झाकले जाते. गणेशास हळदी-कुंकू, अक्षता, गुलाल लावून, ओवाळून त्याच्यासमोर पानाचा विडा ठेवून त्याला आनंदाने वाजतगाजत घरी आणले जाते. सकाळचा योग्य तो मुहूर्त साधून भटजींकडून प्रतिष्ठापना होते. यथासांग पूजा आटोपली की मोदक आणि पुरणपोळ्यांचा नैवेद्य दाखविला जातो. 

साग्रसंगीत तयारी

भाद्रपदामधील शुक्ल चतुर्थीला म्हणजे पहिल्या दिवशी गणेशास २१ प्रकारच्या पत्री म्हणजेच विविध वृक्षवल्लींची पाने अर्पण केली जातात. त्या २१ पत्री म्हणजे- (१) पिंपळ, (२) देवदार, (३) बेल, (४) शमी, (५) दूर्वा, (६) धोतरा, (७) तुळस, (८) भृंगराज / माका, (९) बोर, (१०) आघाडा, (११) रुई/मांदार, (१२) अर्जुन/अर्जुनसादडा, (१३) मरवा, (१४) केवडा/केतकी, (१५) अगस्ती/ हादगा, (१६) कन्हेर/ करवीर, (१७) मालती/मधुमालती, (१८) डोरली/बृहती, (१९) डाळिंब, (२०) शंखपुष्पी/विष्णुकांत, (२१) जाई/चमेली.  

यापैकी तुळस ही फक्त या दिवशीच (गणपती बसतात त्या दिवशीच - भाद्रपद शुक्ल चतुर्थीस) गणेशपूजनात समाविष्ट केली जाते. इतर सर्व पूजांमध्ये महत्त्वाचे स्थान असलेल्या तुळशीस हा दिवस वगळता गणपती पूजनात निषिद्ध मानले जाते. ते का हे वाचण्यासाठी येथे क्लीक करा. 

दहा दिवसात बाप्पाला कधी लाल जास्वंदाच्या फुलांचा हार, कधी दुर्वांचा हार घातला जातो तर कधी फळांचा हार घातला जातो तर कधी विविध फुलांचे छान-छान हार घातले जातात. कमळाचे फूल वाहिले जाते. नैवेद्यासाठी केळीचे पान वापरले जाते.

या दिवशी चंद्राचे दर्शन घेऊ नये  अन्यथा चोरीचा आळ येतो असे म्हणतात. कारण एकदा गजाननाने चंद्राला शाप दिला होता, "जो कोणी जाणता वा अजाणता भाद्रपद शुक्ल चतुर्थीस चंद्रदर्शन करील तो शापास व अतिदु:खास पात्र होईल". ते का हे वाचण्यासाठी येथे क्लीक करा.


यापुढे सर्वात महत्त्वाची म्हणजे नैवेद्याची तयारी, यामध्ये मात्र घरातील स्त्रीयांचे कौशल्य पणाला लागते.  मखरात बसलेल्या गणरायालाही आपल्या कुटूंबियासमवेत जेवणाचे ताट केले जाते, आधि त्याला नैवेद्य दाखवून मगच इतरांचे जेवन होते. त्यामुळे साहजिकच घरात रोज काही ना काही गोडधोड केले जाते. शिवाय आरतीसाठी रोज वेगवेगळी खिरापत करावी लागते. संध्याकाळची आरती आजूबाजूची दोन-चार कुटूंबे एकत्र येतात व सर्वजण मिळून प्रत्येकाच्या घरची आरती करतात. बिल्डींगमध्ये ज्यांच्या घरी गणपती नाही तेही लोक आवर्जून ठरलेल्या वेळी आरतीला हजर राहतात. त्यामुळे संध्याकाळच्या आरतीच्या वेळच्या खिरापतीचे आकर्षण सर्वांनाच असते.

अश्या सर्व धामधुमीत दिवस कसे पटापट निघून जातात तेच कळत नाही. घरातील सर्वांच्या सोयीने चांगला मुहूर्त साधून सत्यनारायणाची पूजा घातली जाते. सर्व आप्तस्वकीय, स्नेही, मित्रपरिवार यांना सत्यनारायण प्रसाद व स्नेहभोजनासाठी आमंत्रित करण्यात येते. त्या दिवशी ज्यांना जी वेळ सोईची वाटेल त्या वेळी म्हणजे सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत लोक आमच्या घरी येत असतात. 


गणरायास निरोप व उत्सवाची सांगता

'येता अनंत चतुर्दशी भादवी महिन्याची, स्वारी निघते गणरायाची' यानुसार अनंत चतुर्दशी म्हणजे गणपती विसर्जनाचा दिवस. या दिवशी गणराय आपल्या गावी जाणार या भावनेनेच मन अगदी सुन्न होते, पण त्यांना निरोप हा द्यावाच लागणार हे सत्य जाणून मनाची तयारीही करावी लागते. या दिवशी सकाळी आरती होत नाही, कारण आरती ही दिवसातून दोनदाच केली जाते (घरातून निघण्यापूर्वी व विसर्जनापुर्वी). 

अनंत चतुर्दशीच्या दिवशी संकटांपासून रक्षण करणारे पंचरंगी दोरे म्हणजे 'अनंत' व 'अनंती' बाजारातून विकत आणले जातात. त्यांची गणपतीसमोर ठेवून पूजा केली जाते. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो. त्यातील एक अनंत गणपतीच्या हातात बांधला जातो व बाकीचे घरातील माणसांना 'अनंत' व स्त्रियांना 'अनंती'  हातात बांधले जातात.

गणरायाचे दुपारचे भोजन व विश्रांती झाल्यावर साधारणतः ४ च्या सुमारास आरतीची लगबग सुरु होते. शेजारी, आप्तस्वकीय, स्नेही, मित्र-मैत्रिणी यांना आरतीसाठी आमंत्रित केले जाते. गणेश गीते लावून, धूप-दीप प्रजल्वीत करून एका प्रसन्न अशा वातावरणाची निर्मिती केली जाते. गणेशासाठी विशेष असा सफरचंदांचा हार केला जातो. सर्व घर गणेशभक्तांनी भरून जाते. खिरापत म्हणून विविध प्रकारच्या मिठाया व मोदक असतात. त्यांची गणेशासमोर आकर्षक मांडणी करून नैवैद्य दाखविला जातो व आरतीस सुरुवात होते, ही आरती जवळपास ५५ मिनिटे चालते. उपस्थित असणारे सर्व लहान-थोर आळीपाळीने आरतीसाठी पुढे जातात व गणरायास ओवाळतात. शेवटी निरोपाचे गीत लावले जाते :

जाहले भजन आम्ही नमितो तव चरणां, नमितो तव चरणां | वारुनियां विघ्ने देवा रक्षावे दिना || धृ० ||
दास तुझे आम्ही देवा तुजलाची ध्यातों,  देवा तुजलाची ध्यातों | प्रेमें करूनियां देवा गुण तुझे गातो ||१||
तारुनी न्यावी सिद्धी देवा हेची वासना, देवा हेची वासना | रक्षूनियां सर्वां द्यावी आम्हासीं आज्ञा ||२||
मागणें तें देवा आतां एकची आहे, आतां एकची आहे | तारुनीयां सकळा आम्हां कृपादृष्टी पाहें ||३||
जेव्हा सर्व आम्हीं मिळू ऐंशा या ठाणा, ऐंशा या ठाणा | प्रेमानंदे लागू तुझी कीर्ती गावया ||४||
सदां ऐशी भक्ती राहो आमुच्या मनीं, राहो आमुच्या मनीं | हेची देवा तुम्हां असे नित्य विनवणी ||५||
वरुनियां संकटे आतां आमुची सारीं, आतां आमुची सारीं | कृपेची सावली देवा दीनावरी करीं ||६||
निरंतर आमुची चिंता तुम्हां असावी, चिंता तुम्हां असावी | सर्वांची लज्जा देवा तुम्ही रक्षावी || जाहले ||७||
निरोप घेतो आता आज्ञा असावी | चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी || जाहले ||८||

त्यानंतर मंत्रपुष्पांजली होते व मग सर्वजण गणरायापुढे नतमस्तक होऊन आपल्याकडून अजाणतेपणे काही चुका झाल्या असल्यास त्याची क्षमा मागतात व आपल्या मनोकामना पूर्ण करण्याची मागणी गणरायाकडे करतात. खिरापतीचे प्रसाद म्हणून वाटप केले जाते. विसर्जन मिरवणुकीपूर्वी थोडा विसावा या हेतूने मखरातील गणेशमूर्ती खाली पाटावर ठेवली जाते. 

गणरायाच्या मिरवणुकीची जय्यत तयारी करण्यात येते. आमच्या तीन कुटुंबियांमध्ये मिळून गणरायाची मिरवणूक असते. ऐनवेळी इतर कुटुंबियांचे गणरायही आमच्या मिरवणुकीत सामील होतात. सर्व कुटूंबिय, शेजारी, आप्तस्वकीय, स्नेही, मित्र-मैत्रिणी उत्साहाने मिरवणूकीत सामील होतात. मोठी टेम्पोवजा गाडी फुलांनी सजवून तयार असते. १०-१२ लोकांचे ढोल व बँड पथक सज्ज असते. ढोल व  बँड यांच्या गजरात, फटाक्यांचा कडकडाटात वाजत गाजत मिरवणूक निघते. साधारणतः दोन तास मिरवणूक चालते. अनेक लहान थोर मिरवणुकीत नृत्य करतात. वाजत गाजत जाणाऱ्या आमच्या या मिरवणुकीत वरूण राजा देखील हमखास आपली हजेरी लावून जातो. त्यामुळे पाऊस येताच बाप्पाच्या डोक्यावर छत्री धरण्यासाठी लहान मुले सज्ज असतात. विसर्जनासाठी जवळच्या नदीकिनारी जाता जाता गणरायाला पुढच्या वर्षी लवकर येणाची आर्जवे केली जातात .

|| गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... ||
|| गणपती चालले गावाला... चैन पडेना आम्हांला... ||
|| मोरया रे बाप्पा मोरया रे... मोरया रे बाप्पा मोरया रे ... ||
|| एक, दोन, तीन, चार... गणपतीचा जयजयकार... ||
|| अर्धा लाडू चंद्रावर... गणपतीबाप्पा उंदरावर... ||
|| मंगलमूर्ती मोरया... गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या ||
|| गणपतीबाप्पा मोरया.. ||


...अश्या घोषणांनी सारा आसमंत दुमदुमून जातो.

विसर्जनस्थळी जावून गणपतीची पूजा व आरती केली जाते, तिथे दही-भाताचा नैवेद्य दाखविला जातो. आम्हीं आमचा गणपती होळकर पुलावर घेवून जातो. तिथे दक्षिणा घेवून गणेश मूर्ती विसर्जित करण्यासाठी २-३ व्यक्ती असतात, त्यांच्याकरवी आपली गणेशमूर्ती नदीच्या मध्यभागी नेली जाते व विसर्जित केली जाते. आमची गणेश मूर्ती साधारणतः साडेतीन फूट उंच व जड असल्याकारणाने ती पटकन विसर्जित होत नाही. तिला विसर्जित होत असताना पाहताना डोळ्यात कधी अश्रू येतात हेच कळत नाही.  साश्रूनयनांनी व जड अंत:करणाने आपल्या लाडक्या गणरायास निरोप दिला जातो. मूर्ती विसर्जित केली त्या ठिकाणाची वाळू तेथील व्यक्ती आपल्याला देतात. घरी येवून ती वाळू गणेशाची ज्या ठिकाणी स्थापना केली होती तिथे रात्रभर ठेवली जाते. दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून सर्व घरभर टाकली जाते. विसर्जनानंतर घरी आल्यावर गणरायाची रिकामी जागा पाहून मन अस्वस्थ होते व पुढच्या वर्षाच्या गणेश उत्सवाच्या आशेने या मंगलमयी सोहळ्याची सांगता होते.

भाद्रपदामधील शुक्ल चतुर्थीला म्हणजे पहिल्या दिवशी गणेशास २१ प्रकारच्या पत्री वाहिल्या जातात. त्या २१ पत्रीं वाहताना करावयाचा मंत्रोच्चार  व त्या वृक्षांचे तपशीलवार महत्व  वाचण्यासाठी क्लिक करा.

2 comments:

अमोल केळकर म्हणाले...


खुप छान माहिती, सादरीकरण. एक अतीशय चांगला ब्लॉग

Sheetal Kachare म्हणाले...

धन्यवाद!

नविनतम लेख मिळवा थेट तुमच्या ईमेलवर (Subscribe via Email)

इथे तुमचा ईमेल आयडी द्या:


(ई-मेल ची पडताळणी करणे आवश्यक!!!)

ब्लॉग मंजूषा (मागील पोस्ट पहा) ...

    आरती संग्रहकोश

    ऑनलाईन सोबती

    वाचक संख्या

    free counters